बंगळुरूस्थित लेखकिने  प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावर वाङ्‌मय चोरल्याचा आरोप  केला आहे. भगत यांच्याविरोधात अन्विता बाजपाई यांनी वाङ्‌मय चौर्याची तक्रार दाखल केल्यानंतर बंगळुरू न्यायालयाने चेतन भगत यांच्या ‘वन इंडियन गर्ल’ या पुस्तकाची विक्री तात्पुरती बंद करावी असे आदेश दिले आहेत. ‘लाइफ, ऑड अॅंड एंड्स’ या पुस्तकातील एका कथेच्या आधारावर चेतन भगत यांनी आपली कादंबरी वन इंडियन गर्ल लिहिली आहे असे त्या लेखिकेनी म्हटले आहे.

चेतन भगतने यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून कथा लिहितो. वन इंडियन गर्ल असो किंवा माझी इतर पुस्तके, ही सर्वार्थाने माझीच आहे. त्यातील पात्र, कथा, प्रसंग सर्वांची निर्मिती मीच केली आहे. यापूर्वी मी माझ्या आयुष्यात कधीही अन्विता या लेखिकेचे नाव ऐकले नव्हते असे चेतन भगत यांनी म्हटले. माझे प्रकाशक लेखिकेला कायदेशीर उत्तर देतील असे ते म्हणाले.

बंगळुरू येथे एका साहित्य संमेलनादरम्यान माझी आणि चेतन भगत यांची भेट झाली होती. मी तेव्हा माझे पहिले पुस्तक लाइफ, ऑड अॅंड एंड्स हे चेतन भगत यांना वाचण्यासाठी दिले होते. हे पुस्तक वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया कळवा अशी विनंती मी त्यांना केली होती. बरेच दिवस झाले त्यांचे उत्तर आले नाही त्यामुळे मी त्यांना इमेल केला. त्याचेही उत्तर आले नव्हते असे अन्विता यांनी म्हटले. त्यानंतर वन इंडियन गर्ल प्रकाशित झाले.

त्या पुस्तकाची कथा वाचल्यानंतर मला धक्काच बसला. हे पुस्तक माझ्या पुस्तकातील ‘ड्रॉइंग पॅरालल्स’ या कथेवर आधारित असल्याचे माझ्या लक्षात आले. याबाबत विचारणा करण्यासाठी मी चेतन भगत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर मी त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अन्विता यांनी म्हटले.