काश्मीरमध्ये अजून संघर्ष सुरूच असून सुरक्षा दले व निदर्शक यांच्यातील चकमकीत एक पंधरा वर्षांचा मुलगा ठार झाला. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्य़ात सोपो येथे ही घटना घडली आहे, त्यामुळे ९ जुलैपासूनच्या संघर्षांतील मृतांची संख्या ६९ झाली आहे.

सोपोर मधील लोडोरा भागात दगडफेक करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात दानिश मंझूर व इतर सहा जण जखमी झाले . दानिश याला रूग्णालयात दाखल केले असता त्याचे निधन झाले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दानिशच्या मृत्यूमुळे मृतांची एकूण संख्या आता ६९ झाली आहे. काश्मीरमध्ये आज ५३ दिवसांनी सर्व भागात संचारबंदी उठवण्यात आली असता हा प्रकार घडला.

काश्मीरमध्ये आज कुठेही संचारबंदी नव्हती. श्रीनगर व एम.आर.गंज तसेच नौहाटा भागात संचारबंदी उठवण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारत असल्यामुळे संचारबंदी उठवण्यात आली होती. सुरक्षा दलांनी संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त मात्र ठेवला आहे. खोऱ्यातील अनेक भागात आज वाहतूक चांगली सुधारली होती , लोकांची वर्दळ दिसत होती. श्रीनगर शहरात सोमवारी संचारबंदी उठवण्यात आली. तेथे खासगी मोटारी, रिक्षा रस्त्यावर दिसू लागल्या होत्या.

लाल चौक भाग गजबजून गेला होता. खोऱ्यातील इतर भागात जनजीवन विस्कळित राहिले. शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद होत्या. सरकारी कार्यालयात उपस्थिती कमी होती. काश्मीर खोऱ्यात ९ जुलैपासून संचारबंदी होती. फुटीरतावाद्यांनी बंदची मुदत नंतर १ सप्टेंबपर्यंत वाढवली होती.