आयसिसच्या संपर्कात असलेल्या आणखी एका संशयिताला शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मोहसिन असे त्याचे नाव असून, तो मुळचा मुंबईतील राहणार आहे. तो सीरियामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहसिन याला शुक्रवारी सकाळी दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकावरून (ISBT) अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून ८५ हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे. उत्तराखंडमधून गेल्या महिन्यात ताब्यात घेण्यात आलेल्या चार संशयितांना आयसिसमध्ये जाण्यासाठी मोहसिन मदत करीत होता. तो या सर्वांच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलीस तपासात मिळाली आहे.
आयसिस या दशतवादी संघटनेच्या प्रभावात आणि संपर्कात असलेल्या तरुणांना ताब्यात घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून देशभर मोहिम राबविण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी भोपाळमधून एका तरुणाला ताब्यात घेतले. तत्पूर्वी मुंबईतील मुंब्र्यातूनही एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.