चामराजा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार एच. एस. शंकरलिंगे गौडा यांनी शनिवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने कर्नाटक भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. तथापि, आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे. आपले सरकार कार्यकाल पूर्ण करील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
विधानसभेचे अध्यक्ष के. जी. बोपय्या यांची जवळपास दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर शंकरलिंगे गौडा यांनी आपला राजीनामा त्यांना सादर केला. बोपय्या यांनी त्यांचा राजीनामा त्वरित स्वीकारला. शंकरलिंगे गौडा हे जेडीएस पक्षात दाखल होणार आहेत.
वनमंत्री सी. पी. योगीश्वर आणि लघुउद्योगमंत्री राजू गौडा यांनी राजीनामे दिल्यानंतर दोनच दिवसांनी शंकरलिंगे गौडा यांनी राजीनामा दिला आहे. शंकरलिंगे गौडा यांच्या राजीनाम्यामुळे आता कर्नाटक विधानसभेतील भाजपच्या आमदारांचे संख्याबळ १०४ झाले आहे. योगीश्वर यांचा राजीनामा स्वीकारल्यास हे संख्याबळ १०३ वर जाणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका येत्या मे महिन्यात होणार आहेत.