जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे ५ ऑगस्ट रोजी सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद याला जिवंत पकडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पाकिस्तानच्याच सज्जाद अहमद (२२) या आणखी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात लष्कराला यश आले. काश्मीरमध्ये बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले असून त्यांचे काही साथीदार फरारी झाल्याची शक्यता आहे.
सज्जाद अहमद हा पाकिस्तानच्या नैर्ऋत्येकडील मुझफ्फरगडचा आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बारामुल्ला जिल्ह्य़ातील रफियाबाद येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीनंतर सज्जादला जिवंत पकडण्यात आले. या चकमकीत एक दहशतवादी बुधवारी ठार झाला तर अन्य तीन दहशतवादी गुरुवारी ठार झाले. या चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे.
काश्मीरच्या उत्तरेकडील उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेपासून रफियाबाद परिसरात दहशतवाद्यांचा एक गट कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ही जोरदार कारवाई सुरू केली होती. सज्जादला चौकशीसाठी श्रीनगरला नेले
आहे.

अश्रुधूर व मिरची बॉम्ब!
रफियाबादमध्ये एका गुहेत दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळताच जवान तेथे थडकले तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गुहेतून गोळीबार केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी मारले गेले. गुहेत आणखी दहशतवादी असल्याची शक्यता असल्याने लष्कराने तेथे अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडून मिरची बॉम्बचा मारा केला. त्यानंतर जवानांनी गुहेत प्रवेश केला तेव्हा सज्जाद दिसला. त्याला त्वरित अटक करण्यात आली.