उरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलत पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारतीय जवानांनी पहिल्यांदाच अशाप्रकारची कामगिरी करत पाकला मोठा धक्का दिला. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे. मात्र सध्या भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी येत आहे. राष्ट्रीय रायफलचा एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे वृत्त मिळत आहे. पाकिस्तान लष्कराने भारतीय लष्कराला यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईमध्ये हा जवान सहभागी नसल्याचे लष्कराने स्पष्ट केले असून हा जवान चुकून सीमा रेषा पार करुन पाकिस्तानमध्ये गेल्याचे लष्कराकडून सांगण्यात येत आहे. जवानाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा ते आठ दहशतवादी तळांवर भारतीय लष्करांकडून बुधवारी मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. रात्री १२. ३० ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. नियंत्रण रेषे पलीकडे सुमारे एक ते तीन किलोमीटरच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये शंभर जवानांचीतुकडी तैनात करण्यात आली होती. हे सर्व जवान हेलिकॉफ्टरमधून पाकिस्तानच्या हद्दीत उतरले होते. चार तासामध्ये नियोजित कारवाई यशस्वी करुन सर्व जवान सुखरुप परत आले होते.