दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकाला कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंडवाडा येथे आज ही चकमक झाली. अजूनही या भागात कारवाई सुरु आहे.


हंडवाडा पोलिसांच्या माहितीनुसार, वेढा आणि शोध पथकाने येथिल हँगिकूट जंगलात आज सकाळी या कारवाईला सुरुवात केली. मात्र, हा जंगल परिसर खूपच दुर्गम असून याठिकाणी संपर्काची माध्यमेही खूपच कमकुवत आहेत. त्यामुळे या कारवाईबाबत ताजी माहिती देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी पुलवामा येथे लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तर १३ ऑगस्ट रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये हिज्बुलचा ऑपरेशनल कमांडर यासीन इट्टू ऊर्फ महमूद गझनावी मारला गेला होता. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.

गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत. हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुरहान वानी याचा गेल्या वर्षी जुलैमध्ये खात्मा केल्यानंतर येथे दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान, ३० जूलैपासून भारतीय सुरक्षा रक्षकांनी अद्यापपर्यंत २३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर ७ ऑगस्ट रोजी नियंत्रण रेषेवरील मचिल सेक्टरमध्ये ५ सशस्त्र दहशतवादी सुरक्षा रक्षकांपुढे शरण आले होते.