अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात तीनच शेतकरयांनी आत्महत्या केल्याच्या विधानावर ठाम राहणारे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व खासदार अशोक चव्हाण यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासाला जोरदार खडाखडी झाली. अवकाळी पावसावर बोलणारया कृषिमंत्र्यांनी शेतकरयांच्या पिकाचे किती नुकसान झाले याचा साधा उल्लेखदेखील केला नाही . आतापर्यंत महाराष्ट्रात बाराशे शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु कृषिमंत्री सपशेल खोटी आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आधी प्रश्न नीट वाचावा; अशा शब्दात चव्हाण यांनी राधामोहन सिंह यांना जाब विचारला. मात्र कृषिमंत्री आपल्या उत्तरावर ठाम होते.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे किती नुकसान झाले, हाच प्रश्न विचारण्यात आला असल्याचे सांगत राधामोहन सिंह म्हणाले की, गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात तीन शेतकरयांनी आत्महत्या केली आहे. हीच माहिती राज्य सरकारांनी पाठवली आहे. उत्तर प्रदेश सरकारने तर अतिवृष्टी वा गारपिटीमुळे एकाही शेतकरयाने आत्महत्या केली नसल्याचा अहवाल पाठवला आहे. याशिवाय देखील शेतकरयांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या असतील. अशोक चव्हाण यांचे मात्र या उत्तराने समाधान झाले नाही. प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता सरकारने खरी आकडेवारी द्यावी, असे चव्हाण म्हणाले. खा. ए.टी. पाटील यांनीदेखील पीक विमा योजनेसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर राधामोहन सिंह म्हणाले की, चालू आíथक वर्षांत कृषी अकादमी वीमा योजना सुरु करण्यात येईल. अनेक राज्यांनी अद्याप अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले याचा तपशील पाठवला नसल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून दिला जाणारया राज्य आपात्कालीन मदत निधीतून दहा टक्के रक्कम नसíगक संकटात शेतकरयांना मदत म्हणून देता येईल.
‘सामना’वर बंदी घाला’
मुस्लिमांचा मतदारांचा अधिकार काढून घेण्याची भूमिका घेणारया शिवसेनेच्या ’सामना’ या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी कॉंग्रेसने आज लोकसभेत केली. मोदी सरकार भारतीय राज्यघटनेनुसार काम करणार आहे अथवा नाही; हे देखील स्पष्ट झाले पाहिजे, अशा शब्दात कॉंग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला जाब विचारला.
कॉंग्रेसच्या आक्रमकपणामुळे सत्ताधारी भाजप मध्ये चिंतन सुरु झाले आहे. शून्य प्रहरात खरगे यांनी ’सामना’ मधील लेखाच्या निमित्ताने केंद्र सरकार वर जोरदार हल्ला चढवला. काही नेते संविधानविरोधी वक्तव्ये आहेत; काही खासदार संविधानविरोधी लिखाण करीत आहेत, असा आरोप कुणाचेही नाव न घेता खरगे यांनी केला.

 गिरीराज यांना रडू कोसळले..
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात वर्णद्वेषी विधान करणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. मोदी यांनी शाळा घेतल्याने गिरिराज सिंह यांना रडू कोसळले. अर्थात गिरीराज यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटलोच नसल्याचे सांगत हे वृत्त निराधार असल्याचा दावा केला. भाजप नेत्यांनी यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. राजीव गांधी यांनी नायजेरियन महिलेशी विवाह केला असता व ती रंगाने काळी असती तर कॉंग्रेसने त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का, असा प्रश्न विचारून गिरीराज सिंह यांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन मांडले होते.