जर तुम्ही टोमॅटो खात असाल, तर तुम्ही मध्यमवर्गीय नसून श्रीमंत आहात कारण, टोमॅटो हे श्रीमंतांचे खाणे असल्याचे अजब तर्कट भाजपचे राज्यसभा सदस्य प्रभात झा यांनी मांडले आहे. महागाईने देशातील नागरिक त्रस्त असताना सत्ताधारी भाजप नेत्याकडून अशाप्रकराचे वक्तव्य म्हणजे सामान्य जनतेने ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करण्यासारखे आहे.
जून महिन्यात दडीमारून बसलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजरी लावली असली तरी, योग्यवेळी पाऊस न झाल्याने भाज्यांच्या वाढलेल्या किंमती अजून खाली आलेल्या नाहीत. यासंदर्भात पत्रकारांनी प्रभात झा यांना छेडले असता त्यांनी अजब तर्कट मांडले, “ज्यांचे गाल लाल असतात, असे श्रीमंत व्यक्तीच फक्त टोमॅटो खातात. त्यांच्याजवळ पैसे असतात. त्यामुळे जराशा किंमती वाढल्या म्हणून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू नका.” असे ते म्हणाले. तसेच टोमॅटोच्या किंमती पावसामुळे वाढल्या आहेत याला सरकार जबाबदारी नाही असेही त्यांनी नमूद केले.
सध्या बाजारात टोमॅटोंच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, १०० रुपये प्रती किलोपर्यंत दर पोहचले आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, किंमती वाढण्याला सरकार जबाबदार नसल्याचे म्हणत सत्ताधारी भाजपचे प्रभात झा आपल्या अगाध ज्ञानातून अजब ‘लॉजिक’ मांडत आहेत.