हुडहुड हे चक्रीवादळ वेगाने आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, रविवार दुपारर्यंत हे वादळ आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमच्या किना-यावर धडकणार आहे. या वादळाचा वेग ताशी १२० किलोमीटर इतका असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावरील दीड लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आंध्रप्रदेश सरकारने पूर्व-पश्चिम गोदावरी जिल्हा, विशाखापट्टणम, विजयनगरम आणि श्रीकाकुल्लम या किनारपट्टीवरील जिल्ह्यात राहणा-या साडेचार लाखाहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागात प्रशासनातर्फे नागरिकांसाठी ३०० मदतकेंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या मदत केंद्रांवर धान्य , पिण्याचे पाणी आणि अन्य जिवनाश्यक वस्तुंचा साठा जमा करण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. तसेच या ठिकाणी विजेचे जनरेटर्स, बोटी आणि सुटकेची उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. हुडहुड वादळाचा धोका लक्षात घेऊन आंध्रप्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना मदतकार्यासाठी तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशमधील विझाग येथे ‘हुडहुड’ वादळ सर्वप्रथम धडकणार असल्याची शक्यता असून, या भागातील ४०,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, त्यांच्या मदतीसाठी १७५ मदतकेंद्रे उभारण्यात आली आहेत.

एनडीआरएफ सज्ज
परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या सहा टीम्स, नौदलाच्या पंधरा टीम्स, २३० लष्करी जवान, ३६ गाडया, बोटी आणि हॅलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४० जवान आहेत. मागच्या वर्षी ‘फायलिन’ या चक्रीवादळाच्यावेळी ओदिशा सरकारने चोख व्यस्था केली होती. तो अनुभव असल्याने यावेळीही ‘हुडहुड’चा सामना करण्यासाठी ओदिशा सरकारने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.