धर्मांतरण आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केलेली वादग्रस्त धार्मिक विधाने यावरून राज्यसभेत निर्माण झालेली कोंडी सुटण्याची अद्याप चिन्हे नाहीत. याविषयावर राज्यसभेत होणाऱया चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे आणि त्यांनीच या चर्चेला उत्तर द्यावे, अशी मागणी करीत कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी राज्यसभेत गोंधळ घातला. यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. सलग चौथ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज तहकूब झाले आहे.
सत्ताधाऱयांचे वर्तन हेकेखोर असल्याची टीका कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली. विरोधकांना राज्यसभेचे कामकाज चालवायचे आहे. मात्र, या विषयावरील चर्चेवेळी मोदींनी सभागृहात उपस्थित राहायला हवे आणि त्यांनी या चर्चेला उत्तर दिले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांच्या गोंधळामुळे शून्यकाळ, प्रश्नोत्तराचा तास तहकूब करावा लागला. दुपारी भोजनानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर धर्मांतरणावरील चर्चेला सुरुवात करण्यात आली. मात्र, मोदी सभागृहात उपस्थित नाहीत, हा मुद्दा उपस्थित करीत कॉंग्रेसच्या खासदारांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. पण राज्यसभेचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागते आहे. यामुळे सरकार हेकेखोर नसून, केवळ सभागृहातील सख्याबळाच्या आधारावर विरोधकच हेकेखोरपणे वागत असल्याचा आरोप राज्यसभेतील सभागृह नेते अरूण जेटली यांनी केला.