भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पक्षाला नाराज असताना विरोधी संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दलाने त्यांना सहानुभूती दाखवली आहे. भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

तर लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाने बाजूला सारले आहे अशी टीका जनता दलाचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्यानेच या नेत्यांना बाजूला केल्याची टीका त्यागी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षात या नाराजीचा स्फोट होईल असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपने मात्र सिन्हा यांच्या नाराजीला विशेष महत्त्व दिलेले नाही.