देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. जीएसटी लागू करण्यासाठी ३० जून रोजी मध्यरात्री संसदेत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, विरोधी पक्षाकडून या विशेष सत्रावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल हे यासाठी डावे, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन यावर विचार करण्याची गळ घालत असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे.

आम्ही दि. २८ जून रोजी मीरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकत्र येत आहोत. त्यावेळी या विषयावर आम्ही चर्चा करून सध्या सर्व विषयांवर आम्ही एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. जोपर्यंत इतर पक्ष आपली भुमिका मांडत नाही तोपर्यंत काँग्रेस काहीही सांगू इच्छित नसल्याचे सूत्रांकडून समजते.

या विषयावर विस्तृत चर्चा सुरू आहे. सध्या सर्वांचे ऐकून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. अद्याप तरी यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.

दरम्यान, एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने मात्र या विशेष सत्रावर बहिष्कार टाकणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. जीएसटी हे खरं तर काँग्रेसचेच अपत्य आहे. यावर बहिष्कार टाकणे म्हणजे त्याचा अनादर करण्यासारखे आहे.

महत्वाचे म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या विशेष सत्रावेळी डायसवर उपस्थित असणार असून ते या वेळी संसदेला संबोधितही करणार आहेत.

सध्या या विषयावर चर्चा सुरू आहे. या सत्राला विरोधाचे मुलभूत कारण म्हणजे यापूर्वी कधीही मध्यरात्री संसदेचे अधिवेशन घेण्यात आलेले नाही. यापूर्वी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले होते. त्यावेळी अधिवेशन बोलावण्यात आले होते. हा सर्व जाहिरातबाजीचा प्रकार असल्याचे एका नेत्याने म्हटले.

यापूर्वीचे मध्यरात्रीचे शेवटचे सत्र हे १९९२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाला ५० वर्षे झाल्यानिमित्त बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला संसद सदस्यांनी उपस्थित राहण्याचे बंधनकारक नाही.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या खास उपस्थितीत होणाऱया या सोहळ्याची सुरुवात ३० जूनला रात्री ११ वाजता होईल. सुमारे दीड तास मध्यरात्री १२.३० पर्यंत हा कार्यक्रम चालेल. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे भाषण होईल. जीएसटीच्या अंमलबजावणीची औपचारिक घोषणा राष्ट्रपती करतील. यावेळी डायसवर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि देवेगौडा हे असणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनाही निमंत्रित केले आहे.