भारताने पाकिस्तासोबत कोणत्याही प्रकारे सौहार्दाचे संबंध ठेवू नयेत असे आवाहन विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यापासून नरेंद्र मोदी यांनी दूर राहावे असाही सल्ला विरोधकांनी दिला आहे. पाकिस्तान हा दहशतवादी कारवाया करून कायम भारताच्या कुरापती काढतो आहे. हे धोरण पाकिस्तानने गेल्या अनेक दिवसांपासून सोडलेले नाही. अशात आता भारताने पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घ्यावी असे मत समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेकडे व्यक्त केले आहे.

भारताने पाकिस्तानसोबत सुरक्षित अंतर ठेवावे असे मत असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळीच कझाकिस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांची भेट घेतली त्यानंतर या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तर काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पंतप्रधानांनी नवाझ शरीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यामध्ये गैर काय? असा प्रश्न सिंघवी यांनी विचारला आहे. तसेच विरोधी पक्षाने कायम सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असे काही नसते. असेही सिंघवी यांनी म्हटले आहे.