महाकाय गैरव्यवस्थापनावर डॉ. मनमोहनसिंग यांचे घणाघाती घाव; रिझव्‍‌र्ह बँकेवरही टीका; राष्ट्रीय उत्पन्न दोन टक्क्यांनी घटण्याचा इशारा

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यामागच्या हेतूंशी मी असहमत नाही; पण त्याची अंमलबजावणी करताना महाकाय गरव्यवस्थापन (‘मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट’) झाल्याची घणाघाती टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. ही तर सामान्यांची संघटित आणि कायदेशीर लूट असून घिसाडघाईने राबविलेल्या या निर्णयाने देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) किमान दोन टक्क्यांनी घटण्याचाही इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान कार्यालयाबरोबरच त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेलाही जबाबदार धरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत डॉ. सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे वाभाडे संयत, पण अतिशय टोकदार शब्दांमध्ये काढले. कोणताही राजकीय अभिनिवेष त्यांच्या छोटेखानी भाषणातून जाणवला नाही. नावाजलेले अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग हे आतापर्यंत नोटाबंदीवर एकही शब्द बोललेले नव्हते. त्यामुळे राज्यसभेत ते बोलायला उठल्यानंतर चिडिचूप शांतता होती. या निर्णयाचे दीर्घकालीन फायदे होतील, या सरकारच्या समर्थनावर ठोस प्रश्नचिन्ह उभे करताना सिंग म्हणाले, या निर्णयातून नेमके काय साध्य होईल, हे कोणालाच सांगता येणार नाही. हे विधान मी अत्यंत जबाबदारीने करतो आहे.

मला काही या बाजूच्या किंवा त्या बाजूच्या चुका दाखवायच्या नाहीत. तसेच काळा पसा रोखण्याच्या, बनावट नोटांना आळा घालण्याच्या आणि दहशतवाद्यांचा वित्तीय पुरवठा रोखण्याच्या हेतूशी मी असहमत नाही, असे सुरुवातीलाच स्पष्ट करून ते म्हणाले, ‘पण ज्या पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी केली, त्यास पर्वताएवढे गरव्यवस्थापन म्हणणार नाही तर आणखी काय म्हणणार? देशातील नव्वद टक्के लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. शेतीमध्ये असलेले ५५ टक्के मनुष्यबळ संकटाच्या छायेमध्ये आहे. पण एका रात्रीत तुम्ही जाहीर केलेल्या या निर्णयाने ग्रामीण, कृषी आणि असंघटितांच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम झालाय, याची कल्पना आहे का? पशांअभावी त्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) दोन टक्क्यांनी कमी होऊ शकते. आणि लक्षात ठेवा, हा किमान आकडा आहे. कदाचित जास्तच नुकसान असू शकते.’

अजूनही वेळ गेली नसल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवीत ते शेवटी म्हणाले, यामध्ये सामान्यांना त्रास न होण्यासाठी पंतप्रधान व्यवहार्य आणि दूरगामी तोडगा शोधतील, अशी आशा मी व्यक्त करतो.

डॉक्टरांची मन की बात

  • नोटाबंदीमुळे सध्या त्रास होईल, पण दीर्घकालीन फायदे होतील, असे म्हणणाऱ्यांनी जॉन केन्स यांचे एक वाक्य लक्षात ठेवावे : अखेर आपण सारेच संपलेलो असू.. (इन द लाँग रन, वुई आर ऑल डेड)
  • सामान्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतलीच पाहिजे. ६०-६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कदाचित आकडा आणखी जास्त असेल. यामुळे देशाचे चलन आणि बँकिंग व्यवस्थेवरील सामान्यांच्या विश्वासाला धक्का पोचलाय
  • पंतप्रधान म्हणताहेत, पन्नास दिवस कळ काढा. हा कालावधी कदाचित छोटासा असेल, पण गरिबांसाठी अत्यंत मोठा आहे. त्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पनाही करता येणार नाही..
  • पंतप्रधानांना माझा सवाल आहे, बँकांमध्ये ठेवलेले स्वतच्या हक्काचे पसेही काढता येऊ न शकणारा असा एकतरी देश या जगामध्ये आहे का? ही एकच बाब उज्ज्वल भविष्याच्या नावाखाली चालू असलेल्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी पुरेशी आहे.

 

काळ्या पशांच्या निर्मात्यांची नाराजी समजण्याजोगी जेटलींचे मनमोहनसिंगांना प्रत्युत्तर 

ज्यांच्या राजवटीमध्ये सर्वाधिक काळा पसा निर्माण झाला, ते आज काळ्या पशांविरुद्ध पुकारलेल्या लढाईला घोडचूक म्हणत आहेत. त्यांच्या नाराजीने अजिबात आश्चर्य वाटत नाही, असा प्रतिटोला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना लगावला. ‘टू जी स्पेक्ट्रम’ गरव्यवहार, कोळसाकांड, राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या आयोजनातील गरव्यवहारांनी डॉ. सिंग यांचे सरकार काळवंडले होते. त्यामुळे काळ्या पशांविरुद्ध आमची कारवाई त्यांना आवडणार नाही. त्यांचा विरोध, त्यांचा त्रागा आम्हाला अपेक्षितच आहे,’ असे जेटली म्हणाले.