पाच वर्षांपूर्वी आपल्या मोटारीखाली महिलेला चिरडल्याचा गुन्हा ऑस्कर पिस्टोरियसचा मोठा भाऊ कार्ल पिस्टोरियसवर दाखल असून, न्यायालयात त्याची सुनावणी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेला अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसवर सध्या मैत्रिणीची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यापार्श्वभूमीवर कार्लबद्दलची माहिती दक्षिण आफ्रिकेतील माध्यमांनी दिली आहे.
सन २००८ मध्ये कार्लची मोटार एका महिलेच्या गाडीला धडकली होती. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत पिस्टोरियस कुटुंबियांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संबंधित घटना ही केवळ एक अपघात असल्याचे म्हटले आहे. कार्लने त्यावेळी दारूचे सेवन केले नव्हते, हे रक्ताच्या नमुन्यांवरून स्पष्ट झाले असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात माध्यमांशी बोलण्यास कार्लने नकार दिला. या खटल्याच्या सुनावणीसाठी गेल्या गुरुवारी कार्ल न्यायालयात हजर होता. त्याला मार्च महिनाअखेरिस पुन्हा न्यायालयात हजर राहण्यात सांगण्यात आले आहे.
मैत्रिणीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तवाहिनीने कार्ल संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले.
(संग्रहित छायाचित्र)