प्रेयसी रीवा स्टीनकेम्प हिचा खून केल्याप्रकरणी पॅराऑलिम्पिकपटू ऑस्कर पिस्टोरियसला दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. त्याला कायद्यातील तरतुदींप्रमाणे खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावण्यासाठी ही याचिका कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑस्करला दोषी ठरविल्यामुळे त्याला आता पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. ऑक्टोबरपासून तो पॅरोलवर कारागृहातून बाहेर आहे.
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्याला खुनाच्या गुन्ह्यातही दोषी ठरविल्यामुळे त्याच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एरिक लीच यांनी हा निकाल दिला. २०१३ मध्ये ऑस्करच्या राहत्या घरीच ही घटना घडली होती व पिस्टोरियस सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी असल्याचे सिद्ध झाले होते.