उद्योगपतींच्या हिताची धोरणे सरकार राबवत असल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार शेतकरी व गरिबांसाठी काम करणारे असल्याचा दावा केला आहे. भाजप विरोधापायी काही जण सरकारला बदनाम करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून आत्मविश्वासाने लोकांपर्यंत जा, असा संदेश त्यांनी पक्षाच्या खासदारांना दिला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध सोमवारपासून सुरू आहे. त्यापूर्वी भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची जंत्रीच सादर केली. काँग्रेसने रविवारी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असतानाच मोदींनी आपले सरकार गरीब व शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईचा निकष ५० टक्क्य़ांवरून ३३ टक्क्य़ांवर आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनधन योजना, मनरेगातील अनियमितता कमी करण्यासाठी अनुदान थेट खात्यात जमा करणे, अशा योजना आणल्याचा उल्लेख केला.
   मात्र भूसंपादन विधेयकाचा उल्लेख त्यांनी केला नाही.  गरिबांसाठीचा एक रुपयातील केवळ १५ पैसेच लोकांपर्यंत पोहचतात या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. अशा प्रकाराचे केवळ विश्लेषण करून उपयोग नाही तर त्यावर उपाय शोघला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
    टीकाकारांकडे दुर्लक्ष करून ज्यांना तुमचे म्हणणे ऐकायचे आहे त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. माध्यमे काय म्हणतात याचा विचार करू नका, असा सल्ला त्यांनी खासदारांना दिला.

सरकारच्या दहा महिन्यांच्या कालावधीत महागाई कमी झाली, तसेच सिमेंटचे दर खाली आले. काही जणांना भाजपवर टीका करण्याची जन्मजात सवय आहे. ती त्यांना करू देत.
 – नरेंद्र मोदी</strong>