सध्याच्या कोळसा खाणीतून होणारे कोळसा उत्पादन येत्या पाच वर्षांत कमी होणार असून मार्च २०२० पर्यंत १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचे सरकारी उद्दिष्ट पूर्ण करण्याची आमची तयारी आहे, असे कोल इंडिया लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीने म्हटले आहे.
कोल इंडिया लिमिटेडच्या उत्पादनाबाबत सविस्तर टिप्पणी सादर करण्यात आली असून त्यात म्हटले आहे, की सध्याच्या खाणींचे कोळसा उत्पादन कमी होत चालले आहे व एकूण २५ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. तथापि आगामी कोळसा प्रकल्पातून कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
कोल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सध्याच्या खाणींमधील उत्पादन २०२० पर्यंत १६५.५६ दशलक्ष टनांपर्यंत कमी होणार आहे, अपेक्षित उत्पादन या वर्षी १९०.५७ मेट्रिक टन आहे.
२०१९-२० पर्यंत कोळसा उत्पादन १ अब्ज टनांपर्यंत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. काही उपकंपन्यांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षमताधिष्ठित प्रकल्पांचा शोध घेण्यास सांगितले आहे. २०१९-२० पर्यंत कोळशाचे उत्पादन ९२५.१० मेट्रिक टन होण्याची अपेक्षा आहे व त्यासाठी २०१४-१५ मध्ये असलेले ५०६.२० मेट्रिक टन उत्पादन ४१८.९० मेट्रिक टनांनी वाढवावे लागणार आहे. २३९ कोळसा प्रकल्पात वाढ नोंदवली आहे तर १८५ प्रकल्पात उत्पादनात घट झाली आहे. एकूण निव्वळ वाढ ही ४१८.९० मेट्रिक  टन आहे. पर्यावरण व वन खात्याचे परवाने, जमीन अधिग्रहण, कोळसा शोधन यामुळे कोळसा उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यात काही अडचणी आहेत. कोल इंडिया कंपनी देशांतर्गत कोळसा उत्पादनातील ८० टक्के उत्पादन करते. गेल्या वर्षी ४८२ मेट्रिक टनाचे उद्दिष्ट दिले होते प्रत्यक्षात ४६२ मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन झाले.