माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांचे मत

मुस्लिमांमधील तिहेरी तलाकची तत्काल काडीमोडाची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बंद होणार असली तरी इतर दोन प्रकारचे तलाक अजूनही अस्तित्वात आहेत त्यामुळे लैंगिक समानता व न्याय याला अजून ती आव्हाने कायम आहेत, असे मत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

तिहेरी तलाक हा न्यायालयाच्या निकालाने बेकायदा ठरला असला तरी इतर दोन प्रकारच्या तलाकचे आव्हान कायम असल्याचे सांगून ते म्हणाले की, तिहेरी तलाक हे कुराणातील मूळ वैध तत्त्वांचे विकृत रूप आहे. तिहेरी तलाक घटनाबाह्य़ ठरवण्यात आला हे चांगलेच झाले. या निकालाने महिलांना समानता व न्याय मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल तिहेरी तलाक म्हणजे तलाक ए बिद्दतवर बंदी घातली आहे, असे असले तरी तलाक अहसान म्हणजे एकदा तलाक उच्चारणे व तलाक हसन म्हणजे महिन्यात एकदा याप्रमाणे लागोपाठ तीनदा तलाक उच्चारणे या तलाकच्या पद्धती अजून शिल्लक आहेत. त्याला न्यायालयाने हात लावलेला नाही त्यामुळे मुस्लीम महिलांची परवड पूर्णपणे थांबली नाही असे चिदंबरम यांनी सांगितले.