इतिहासाचे धडे शिकविल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आता अर्थशास्त्राचे धडे शिकवू लागले असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. सोने खरेदी केल्याने महागाई वाढते, असे वक्तव्य आपण कधीही केले नसल्याचे स्पष्टीकरणही चिदम्बरम यांनी दिले.
परदेशातून सोने खरेदी केल्यास वित्तीय तुटीची स्थिती अधिक खालावते, असे वक्तव्य आपण अनेकदा केले आहे. तथापि, सोने खरेदी केल्याने महागाई वाढते, असे वक्तव्य आपण कधीही केले नाही, असे चिदम्बरम म्हणाले.
पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी झालेल्या जाहीर सभांमधून मोदी यांनी इतिहासाचे काही दाखले दिले होते. त्यामुळे चिदम्बरम यांनी, अर्थतज्ज्ञांनी आता नव्या धडय़ाची दखल घ्यावी, अशी सूचना उपहासाने केली आहे.
परदेशातून सोने खरेदी केल्यामुळे महागाई वाढत असल्याचे वक्तव्य चिदम्बरम यांनी केल्याचे मोदी यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता चिदम्बरम यांनी उपहासाने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांच्याइतके आपण सुशिक्षित नाही, मात्र सोने खरेदी केल्याने महागाई वाढत नाही तर भ्रष्टाचारामुळे महागाई वाढते, याची आपल्याला जाणीव आहे, असेही अर्थमंत्री म्हणाले.