‘निवडणूक आयोगाने मोदींनाच गुजरातच्या निवडणुका घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत. मोदींनी आपल्या शेवटच्या प्रचार सभेनंतरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करावी आणि आम्हालाही तशी माहिती द्यावी, असे निवडणूक आयोगाने ठरवले आहे काय?’ असा टोमणायुक्त सवाल माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर न केल्यावरुन टि्वटरवर चिदंबरम यांनी ही उपहासात्मक टिपण्णी केली आहे.

निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना चिदंबरम आणखी एका ट्विटद्वारे म्हणतात, ‘आपल्या विस्तारित सुट्ट्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने गुजरात सरकारकडून मतदारांना आमिषे दाखवण्यासाठी तसेच लोकप्रिय घोषणा करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आयोगाला कायमच लक्षात ठेवले जाईल.’

चिदंबरम यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट निशाना साधल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गुजरात निवडणूकांवरून काँग्रेस पक्ष आणि स्वतः चिंदबरम हे घाबरले आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करीत आहेत.’ चिंदबरम यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काही जणांनी काँग्रेसच्या बाजूने तर काहींनी भाजपच्या बाजूने पाठींबा दिला आहे. तर, निवडणूक आयोगही आता रिझर्व्ह बँकेप्रमाणे काम करीत आहे. त्यामुळे आयोगही आता आपली विश्वासार्हता गमावून बसला आहे. त्यामुळे कशावरुन आता गुजरातमध्ये पारदर्शी निवडणूका पार पडतील असा सवालही एकाने उपस्थित केला आहे.

दरम्यान, गुजरातच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच गुजरात सरकारने शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि इतर क्षेत्रातील लोकांसाठी अनेक घोषणांची बरसात केली आहे. यामध्ये वेतनवाढ आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या महत्वपूर्ण घोषणांचा समावेश आहे. तसेच गंभीर आजारांसाठीच्या मेडिक्लेममध्ये वाढ करण्यात आली आहे.