काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. या पुरस्कारांसाठी एकूण १८, ७६८ जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी ८९ जणांचीच ( सात पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री) पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नुकतीच शिफारस करण्यात आलेल्या नावांची यादी जाहीर केला आहे. त्यामुळे आता सरकारने पद्म पुरस्कार नाकारलेल्यांमध्ये कोणती बडी नावे आहेत, याची चर्चा रंगली आहे.

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन , खासदार बैजयंता जय पांडा, अध्यात्मिक गुरू राम रहिम सिंग, दिवंगत हवाई सुंदरी नीरजा भानोत यांचा समावेश आहे. विशेष गोष्ट म्हणजे पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा मुळात शिफारस करण्यात आलेल्या यादीतही समावेश नव्हता. शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार या क्षेत्रात पुरस्कार देण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे पद्मविभूषण पुरस्कारासाठी पवार आणि जोशी यांच्या नावांची शिफारस कोणी केली, हेदेखील गुप्त ठेवण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण होण्याची शक्यत आहे.

अनेक शिफारसी येऊनही पुस्कार नाकारण्यात आलेल्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक आहे तो अध्यात्मिक गुरू राम रहीम यांचा. त्यापाठोपाठ १९८६ साली एअर इंडिया विमान हायजॅकच्यावेळी मृत्यूमुखी पडलेली हवाई सुंदरी नीरजा भानोत हिच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणारे अर्ज आले होते. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमिताव रॉय, एनआयचे संस्थापक राधा विनोद राजू यांचाही शिफारस करण्यात आलेल्या नावांच्या यादीत समावेश होता. तर पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेल्या बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, राज्यसभा खासदार जया बच्चन, चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा , गुलाम मुस्तफा वारिस खान आणि संगीतकार अनू मलिक यांचा समावेश होता.

पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी केंद्र सरकारकडून वरिष्ठ अधिकारी आणि जाणकार व्यक्तींची समिती तयार करण्यात आली होती. द्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणाऱया मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.