प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचे आज शनिवारी येथे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. ते दोन वर्षे कर्करोगाशी झुंज देत होते. तेलंग यांच्यावर २०१४ पासून उपचार सुरू होते, पूर्व दिल्लीत मयूर विहार येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
२६ फेब्रुवारीला ते वयाची ५६ वर्षे पूर्ण करणार होते. त्यांच्या पश्चात कन्या व पत्नी आहे. त्यांनी हिंदुस्तान टाइम्स, दी इंडियन एक्सप्रेस, दी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांत व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्यांना गुरगावच्या मेदांता मेडिसिटी रुग्णालयात दाखल केले होते पण महिन्यापूर्वीच त्यांना घरी आणले. २००४ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही.नरसिंहराव, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांना आपल्या कलेतून फटकारे दिले होते. दिवाळीपासून ते जास्तच आजारी होते असे त्यांची कन्या आदिती तेलंग यांनी सांगितले. तेलंग यांचा जन्म राजस्थानात २६ जानेवारी १९६० रोजी झाला व त्यांचे पहिले व्यंगचित्र १९७० मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. १९८२ मध्ये त्यांना मुंबईत इलस्ट्रेटेड विकलीत काम करण्याची संधी मिळाली. लहान असताना त्यांना टिनटिन फँटम व ब्लाँडी या कॉमिक व्यक्तिरेखांचे आकर्षण होते. १९८३ मध्ये ते नवभारत टाइम्समध्ये दिल्लीत रूजू झाले व नंतर अनेक वर्षे हिंदुस्तान टाइम्समध्ये काम केले. नो प्रायमिनिस्टर हे त्यांचे व्यंगचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.