पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली आहे. सांबा आणि कथुआ जिल्ह्य़ातील सीमेवरील ३० ठाणी आणि वस्त्यांवर पाकिस्तानने तोफगोळे आणि बंदुकीने बेछूट गोळीबार केला त्यामध्ये एक नागरिक जखमी झाला.

रविवारी रात्रीपासून पाकिस्तानच्या रेंजर्सनी सांबा आणि कथुआतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या ठाण्यांवर जोरदार गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानने उखळी तोफा आणि मशीनगनने ३० ठाण्यांवर हल्ला केला, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सोमवारी पहाटेपर्यंत गोळीबार सुरू होता. सोमवारी सकाळी रामबाग क्षेत्रात एक नागरिक जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात अनेक गुरे ठार अथवा जखमी झाली आहेत. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात महासंचालक पातळीवर चर्चा झाल्यानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबले होते, मात्र २३ ऑक्टोबरपासून पाकिस्तानने पुन्हा उल्लंघन केले आहे.