कराची नजीकच्या समुद्रात भारतीय पाणबुडी दिसल्याचा पाकिस्तानचा दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचे भारतीय नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. साधारण महिनाभरापूर्वी भारतीय पाणबुडीने सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे लांबा यांनी सांगितले. मात्र, भविष्यात भारतीय नौदल स्वत:च्या गरजेप्रमाणे सागरी क्षेत्रात पाणबुड्या तैनात करेल, असेही त्यांनी सांगितले.

नौदल दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅडमिरल सुनील लांबा बोलत होते. भारताच्या सागरी हद्दीत कोणताही धोका निर्माण झाल्यास ती परिस्थिती हाताळायला नौदल सक्षम आहे. हाच आमच्या प्राधान्याचा मुद्दा आहे. मात्र, भारतीय नौदलाकडून पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात कोणतीही पाणबुडी तैनात करण्यात आली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखाद्या देशाच्या सागरी क्षेत्रात पाणबुडी तैनात करणे सोपे काम नसते. त्यामुळे पाकिस्तानचा दावा पूर्णपणे बोगस असल्याचे लांबा यांनी म्हटले.

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील ग्वादार बंदरामधून चिनी व्यापारी मालाच्या वाहतुकीस सुरुवात झाली आहे. तेथील घडामोडींवरही भारतीय नौदल लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षभरात भारतीय संरक्षण दलांच्या तळावर झालेल्या हल्ल्यांनंतर सर्वच तळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नौदलाने त्यांच्या अनेक तळांवरील सुरक्षेचा आढावा बारकाव्यानिशी घेतला आहे. नौदल तळांच्या सुरक्षेसाठी काही ठिकाणी वीजप्रवाह खेळविलेले कुंपण घालण्यात आले आहे. मात्र सर्वच ठिकाणी ते शक्य नाही. मात्र सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी सर्वतोपरी घेतली जात आहे. त्यासाठी नौदलाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधारही घेतला आहे. शिवाय इतर सुरक्षा यंत्रणांसोबत सुरक्षा सरावही केला आहे. जमिनीवरून तसेच समुद्रातून असलेला धोका या दोन्ही पातळ्यांवर सुरक्षा आढावा व्यवस्थित घेण्यात आला आहे. मुंबईनजिक समुद्रामध्ये मध्यंतरी काही सांकेतिक संभाषण झाल्याची तक्रार होती, त्या संदर्भातही तपास करण्यात आला असून सुरक्षेमध्ये कोणतीही ढिलाई नसल्याचेही नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.