बलुचिस्तानातील नेते अकबर बुग्ती २००६ च्या लष्करी कारवाईत ठार झाले होते, त्या प्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना मंगळवारी जामीन नाकारला. या अर्जावरील निर्णय न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला होता.
मुशर्रफ यांच्या आदेशावरून झालेल्या कारवाईत बुग्ती ठार झाले होते. त्यांचा मुलगा जमील बुग्ती याने त्यासाठी मुशर्रफ, माजी पंतप्रधान शौकत अझीझ, माजी अंतर्गत मंत्री आफताब अहमद खान, बलुचिस्तानचे माजी गव्हर्नर ओवेस घानी आणि स्थानिक अधिकारी अब्दुल लासी यांना जबाबदार धरले आहे. मुशर्रफ आणि अन्य अधिकारी हजर न राहिल्याबद्दल न्यायालयाने सोमवारीच त्यांच्याविरुद्ध वॉरण्ट जारी केले होते.