लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख ले. जनरल हुडा यांचा आरोप

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तानचा थेट हात असल्याचा आरोप लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी केला. तसेच राज्यातील सध्याच्या अस्थिर स्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तान नियंत्रण रेषेवरून घुसखोरांना पाठवण्याचे आणखी प्रयत्न करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातील भारताची ‘ऑपरेशन विजय’ ही कारवाई २६ जुलै रोजी यशस्वी झाली होती. त्याच्या १७व्या स्मृतिदिनानिमित्त (कारगिल विजय दिन) जम्मू-काश्मीरमधील द्रास येथील युद्ध स्मारकावर आयोजित कार्यक्रमात शहीद जवानांना आदरांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.

‘भारताविरुद्ध छेडलेल्या छुप्या युद्धात पाकिस्तानचा थेट सहभाग आहे यात तीळमात्र शंका नाही. सीमेवरील सर्व क्षेत्रांमधील घडामोडींमधून त्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. पाकिस्तान घुसखोरांना सक्रिय मदत करत आहे. घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसवण्यास मदत करण्यासाठी शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा-जेव्हा अशांतता असेल तेव्हा-तेव्हा पाकिस्तान त्याचा गैरफायदा घेण्यास तयार असते. काश्मीरमध्ये काहीही घडले तरी त्याला पाठिंबा देण्यास तयारी असल्याची विधाने आपण हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाकडून ऐकली आहेत. त्यांना पाकिस्तानकडून मिळणारा पाठिंबा केवळ शाब्दिक नाही तर शस्त्रास्त्रांचा आणि प्रशिक्षणाचाही आहे,’ असे हुडा यांनी सांगितले.

अलीकडच्या काळात झालेले घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. तसेच राज्यात समाजमाध्यमांच्या वापरातून वाढणाऱ्या मूलतत्त्ववादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांसारखी समाजमाध्यमे वापरणारी तरुणाई मोठय़ा प्रमाणावर दहशतवाद्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडत आहे. त्यातून तंत्रज्ञानाच्या वापरात पारंगत असलेले नवे दहशतवादी तयार होत आहेत. हे थांबवण्यासाठी सर्व स्तरांवरून तातडीचे प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लष्कराने गेल्या काही दिवसांत घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. गेल्या २-३ दिवसांत घुसखोरी केलेल्या ४ दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या कारवायांत नुकतेच दोन जवानांना वीरमरण आले. सध्याच्या अस्थिरतेचा फायदा घेऊन घुसखोरीत वाढ होत आहे. पण लष्कर त्याचा सामना करण्यास सुसज्ज आहे, असे हुडा म्हणाले.

 

काश्मीरमध्ये ताबारेषेवर चकमकीत चार दहशतवादी ठार

पीटीआय, श्रीनगर

काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्हय़ात प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या चकमकीत नौगामा येथे चार दहशतवादी मारले गेले असून, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  नौगामा येथे मारले गेलेले दहशतवादी परदेशी होते व त्यातील एकाला जिवंत पकडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही चकमक अजून सुरू असून तो घुसखोरीचा प्रयत्न होता किंवा काही वेगळे होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. एकाला जिवंत पकडण्यात आले असून, त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील असे सांगण्यात आले.

दहशतवाद्याला जिवंत पकडले हे मोठे यश

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्याला अटक करण्यात आली हे सुरक्षा दलासाठी मोठे यश आहे, कारण त्यामुळे पाकिस्तानच्या कारवाया उघड झाल्या आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. दहशतवाद्याला जिवंत पकडणे हे मोठे यश आहे, त्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे उघड झाले आहेत, असे ते म्हणाले. कुपवाडा जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या नौगाम येथे सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले.