पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांची दर्पोक्ती; भारतीय संरक्षणतज्ज्ञांकडून खिल्ली
पाकिस्तानला वाटल्यास अण्वस्त्र डागून दिल्ली पाच मिनिटांत बेचिराख करू शकतो, अशी दर्पोक्ती पाकि स्तानच्या अणुबॉम्बचे जनक असलेले डॉ. अब्दुल कादीर खान यांनी केली. पाकिस्तानच्या अणुचाचण्यांना १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही वल्गना केली. खान यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे भारतीय संरक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने १९९८ मध्ये खान यांच्या नेतृत्वाखाली अणुचाचण्या घेतल्या होत्या. पाकिस्तान १९८४ मध्येच अणुशक्तीधारी देश बनला असता पण अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनी अणुचाचण्यांना विरोध केला होता, असे खान यांनी सांगितले. जनरल झिया हे १९७८ ते १९८८ दरम्यान अध्यक्ष होते पण त्यांनी अणुचाचण्यांना विरोध केला, कारण अणुचाचण्या केल्यास जागतिक समुदाय पाकिस्तानात लष्करी हस्तक्षेप करील, असे त्यांना वाटत होते. आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाणिस्तानातील सोविएत आक्रमणामुळे पाकिस्तानला देत असलेली मदतही बंद होईल, अशी भीती झिया उल हक यांना वाटत होती. पण आम्ही तेव्हाच अणुचाचणी करायला तयार होतो. हक यांनी त्याला विरोध केला, असे खान म्हणाले.
भारताचे माजी लष्करप्रमुख आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या थिंक टँकचे संचालक जनरल एन. सी. विज (निवृत्त) यांनी म्हटले की, अशा प्रकारची विधाने करणे हे अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरासाठी नसतात तर ती केवळ धाक दाखवण्यासाठी असतात. भारताकडेही अल्प काळात संपूर्ण पाकिस्तानला लक्ष्य करण्याची क्षमता आहे. मात्र आम्ही त्याची जाहीर वाच्यता करत नाही.
दिल्लीतील इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडिज अँड अ‍ॅनलिसिस या संस्थेतील वरिष्ठ अभ्यासक आणि निवृत्त ब्रिगेडिअर गुरमित कंवल यांनी म्हटले की, अशा प्रकारची बेताल वक्तव्ये आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे करण्याची खान यांना सवयच आहे. अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरण्यासाठी नाही तर धाक दाखवण्यासाठी असतात. पाकिस्तानच्या अस्तित्वाला गंभीर धोका उद्भवल्यासच त्यांच्याकडून अण्वस्त्रांचा वापर होईल. वादासाठी गृहीत धरले की पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अगदी उद्या भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचे आदेश दिले तरी त्यांना सर्व जुळवाजुळव करून हल्ला करण्यासाठी किमान सहा तासांचा वेळ लागेल.
सेंटर फॉर एअर पॉवर स्टडिजचे वरिष्ठ अभ्यासक आणि निवृत्त एअर व्हाइस मार्शल मनमोहन बहादूर यांनी सांगितले, अण्वस्त्रे प्रत्यक्ष वापरासाठी नसतात हे पाकिस्तानी राज्यकर्ते जाणतात. पण ए. क्यू. खान केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपले महत्त्व वाढवण्यासाठी अशी विधाने करत आहेत. त्यांच्यासारख्या अण्वस्त्रप्रसार करणाऱ्यांकडे फारसे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही.
सोसायटी फॉर पॉलिसी स्टडिजचे संचालक निवृत्त कमोडोर सी. उदय भास्कर यांनी म्हटले की, अशी नाटय़मय विधाने करून प्रसिद्धीझोतात राहण्याची खान यांची सवय सर्वाना माहीत आहे. दिल्लीवर पाच मिनिटांत हल्ला करण्याची भाषा जुनीच आहे. अण्वस्त्रप्रसाराला कारणीभूत असलेल्या आणि पाकिस्तानातच अपमानित व्हावे लागलेल्या खान यांच्या वक्तव्याला भारतात फार महत्त्व मिळण्याची व त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची गरज नाही.