जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असून त्याबाबत कोणतीही तडजोड होऊच शकणार नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र आमसभेत पाकिस्तानला दिले. काश्मीरसह सर्वच प्रश्नांवर आम्हाला पाकिस्तानशी चर्चा करायची आहे पण ही चर्चा सिमला कराराच्या चौकटीत आणि द्विपक्षीयच झाली पाहिजे आणि पाकिस्ताननेही त्यांच्या भूमीवरील भारतविरोधी दहशतवादी अड्डे समूळ नष्ट केले पाहिजेत, असेही सिंग यांनी ठामपणे सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आमसभेत शुक्रवारी केलेल्या भाषणात काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. त्याला पंतप्रधानांनी शनिवारी सडेतोड उत्तर दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची शरीफ यांची मागणीही सिंग यांनी स्पष्टपणे धुडकावली. संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वी केलेले ठराव भारत कालबाह्य़ मानतो, असेही त्यांनी सांगितले. सीमेपलीकडून पुरस्कृत केलेला दहशतवाद ही भारताची चिंता आहे, दहशतवादाचे केंद्र आमच्या शेजारी म्हणजे पाकिस्तानात आहे असा स्पष्ट उल्लेखही पंतप्रधानांनी केला. दहशतवाद हा जगभर सुरक्षा व स्थैर्याला धोका निर्माण करीत असून जगभरात निरपराधांचे जीव घेत आहे, असे सांगताना त्यांनी जम्मूतील गुरुवारचा हल्ला व केनयातील मॉलवरचा हल्ला यांचा उल्लेख केला.
पुन्हा हल्ला
दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर व पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच शनिवारी दुपारी लष्करावर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील सनतनगर आणि हैदरपोरा बायपास मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लष्कराच्या वाहनावर हा हल्ला केला, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एक नागरिक जखमी झाला.     
सिंग-शरीफ चर्चा आज
*सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याच्या आरोपाला अमेरिकेकडून पाठबळ मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर रविवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात न्यूयॉर्क येथे चर्चा होणार आहे.
*पाकिस्तानच्या भूमीवरून
होत असलेल्या भारतविरोधी कारवायांचा बीमोड करण्याचा मुद्दा पंतप्रधान मांडणार असल्याच समजते. भारताशी संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त करीत शरीफ यांनीही या भेटीसाठी उत्सुकता
दर्शविली आहे.