पाकिस्तान लष्कराने मध्यस्थी केल्यानंतर तेथील राजकीय पेच संपण्याचा दावा केला जात असतानाच आता कॅनडाहून येथे आलेले धर्मगुरू व पाकिस्तानी अवामी तेहरिक पक्षाचे नेते ताहिर उल काद्री यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २४ तासांत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
काद्री यांच्या गटाने इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यात या पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांचा समावेश होता. त्यात कुरेशी यांनी पाकिस्तान अवामी तेहरिकला पुढचा डाव टाकण्याची घाई करू नका असा सल्ला दिला. या बैठकीनंतर कुरेशी यांनी पाकिस्तानी अवामी तेहरिक या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पण पुढची चाल लांबणीवर टाकण्यास निदर्शकांनी नकार दिला.
काद्री यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या प्रस्तावास मान्यता देण्यास सांगितले, पण या दोन्ही पक्षांत मततभेद झाले. पीएटी व पीटीआय या दोन्ही पक्षांच्या समर्थकांत फूट पडली. दरम्यान, रात्री इमरान खान यांनी असे सांगितले, की लाहोर, कराची, फैसलाबाद व मुलताना येथे धरणे आंदोलने करण्याची आपल्या पक्षाने घोषणा केली.
संसदेबाहेर खान यांनी सांगितले, की पुढील रविवारी आपण पुढची चाल जाहीर करून २०१३ च्या निवडणुकीतील हेराफेरीची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग नेमण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरीफ पंतप्रधानपदी राहिल्यास चौकशी निष्पक्षपाती होणार नाही असा दावा केला.
दरम्यान, लष्कराची पडद्याआडून मध्यस्थी चालू असून, काद्री व खान यांनी लष्करप्रमुख राहील शरीफ यांची भेट घेतली. निवडणूक सुधारणांशी संबंधित सर्व मागण्या शरीफ यांनी मान्य केल्या आहेत, फक्त पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपण लष्कराला मध्यस्थीसाठी बोलावले नव्हते व तेही आले नव्हते असा दावा केला.