पाकिस्तान अमेरिकेचा वापर एखाद्या पैसे संपणाऱ्या अमर्याद एटीएमप्रमाणे करतो आहे आणि अमेरिकेच्या बहुतांश आर्थिक मदतीचा उपयोग हा पाकिस्तानचं सैन्य पोसण्यासाठी केला जातो, असा धक्कादायक खुलासा रेमंड डेव्हिस या लेखकानं त्याच्या द कॉन्ट्रॅक्टर या पुस्तकात केला आहे. रेमंड डेव्हिसला दोन पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता. रेमंड डेव्हिसचा खटला पाकिस्तानच्या कोर्टात सुरू होता. मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यानं त्याला सोडण्यात आलं.

रेमंड डेव्हिस हा सीआयएचा एजंट असून त्यानं त्याच्या पुस्तकात पाकिस्तानी नागरिकांची हत्या केली याचं वर्णन केलं आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानची यंत्रणा आतून कशी पोखरून निघाली आहे याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे डेव्हिडनं लिहीलेलं हे पुस्तक चांगलंच वादात सापडलं आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तिथले सत्ताधारी यांच्यातल्या ताळमेळाबाबतही डेव्हिसनं भाष्य केलं आहे. पाकिस्तानमधले राजकारणी तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांशी कायम खोटं बोलत असतात.

पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून या ठिकाणी बराच काळ लष्कराचीच राजवट होती. या देशातलं राजकीय वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे, तसंच लष्कर आणि राजकीय नेते यांच्यात काहीही आलबेल नाही असाही उल्लेख डेव्हिसनं आपल्या पुस्तकात केला आहे. तसंच इथं दहशतवादाला कायम खतपाणी घातलं जातं असंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. या पुस्तकामुळे मध्यंतरी पाकिस्तानात मोठा वाद निर्माण झाला होता.

मात्र या पुस्तकाप्रकरणी पाकिस्ताननं रडगाणं सुरू केलं आहे. रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेनं या डेव्हिसला पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी पुस्तक लिही असं सांगून त्यासाठी पैसे दिले आहेत असा आरोप केला आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री रहमान मलिक यांनी हा आरोप केला आहे. डेव्हिसला अटक झाली तेव्हा मलिक पाकिस्तानचे गृहमंत्री होते. जोवर आमच्या कोर्टानं डेव्हिसला आरोपमुक्त केलं नाही तोवर आम्ही त्याला सोडलं नाही, मात्र पाकिस्तानातून सुटल्यावर डेव्हिसनं जाणीवपूर्वक पुस्तक लिहून आमची बदनामी सुरू केली आहे, असा कांगावा पाकिस्ताननं सुरू केला आहे आणि त्यासाठी चक्क भारताला जबाबदार धरलं आहे.