पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे तेलाच्या टँकरला लागलेल्या आगीत सुमारे १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत ४० जण जखमी झाले असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

बहावलपूरमधील अहमदपूर शरिया येथे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी तेलाचा एक टँकर उलटला होता. टँकरमधून तेलाची गळती सुरु झाल्याने हे तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी टँकरजवळ धाव घेतली. मात्र यादरम्यान टँकरचा स्फोट झाला असून तेल घेण्यासाठी आलेल्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार तेलाच्या टँकरजवळ काही स्थानिक सिगारेट ओढत होते. त्यामुळे आग लागली असावी अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

आगीत १२ पेक्षा जास्त कार, ७५ दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या. मृत्यू झालेले सर्व जण हे राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातील निवासी होते. काही मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण असून डीएनए तपासणीशिवाय पर्याय नाही असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आगीत ४० जण भाजले असून त्यांना बहावल व्हिक्टोरिया रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.