पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे लेफ्ट. जन. रिझवान अख्तर यांची पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या प्रमुखपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली.
लष्करात मोठय़ा प्रमाणावर फेरबदल करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून लेप्ट. जन. अख्तर यांची आयएसआयचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशात राजकीय अस्थिरता असून त्या स्थितीत आपले अधिकार अबाधित ठेवण्यास त्यामुळे शरीफ यांना मदत होणार आहे.
रिझवान अख्तर, हिलाल हुसेन, गयूर मेहमूद, नाझीर बट, नवीद मुख्तार, हियात-ऊर-रेहमान यांना बढती देण्यात आली असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे जनसंपर्क अधिकारी मे. आसिम बाजवा यांनी ट्विट केले आहे.
अख्तर यांची महासंचालक म्हणून तर हिदायत यांची पेशावरचे कमांडर, मुख्तार यांची कराचीचे कमांडर, हुसेन यांची मंगलाचे कमांडर, मेहमूद यांची गुजरनवालाचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बट यांची माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या १ ऑक्टोबर रोजी लेफ्ट. जन. झहिरूल इस्लाम यांच्याकडून अख्तर महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. लष्करप्रमुख आयएसआयच्या प्रमुखपदाच्या नावाची शिफारस पंतप्रधानांना करतात अशी प्रथा आहे.