पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्या मध्यस्थीमुळे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारपुढे असलेला पेचप्रसंग जवळपास संपुष्टात आला आहे. या सगळ्या प्रकारात आता राहील शरीफ यांनी मध्यस्थी करावी, असे नवाझ शरीफ यांनी म्हटले होते. त्याला इमरान खान व ताहिर उल काद्री या विरोधक नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान,आपण लष्कराच्या मध्यस्थीची मागणी केली नव्हती व लष्करही आपल्याकडे मध्यस्थीचा प्रस्ताव घेऊन आले नव्हते, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीत सांगितले.
 पाकिस्तानातील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याने शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी पाकिस्तान तेहरीक-ए- इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान व कॅनडा येथून आलेले पाकिस्तान अवामी तेहरीकचे नेते धर्मगुरू ताहिर उल काद्री यांनी आंदोलन पुकारले होते. गेले दोन आठवडे त्यांच्या समर्थकांनी राजधानीत निदर्शने करून त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले होते. इमरान खान व काद्री यांनी लष्करप्रमुखांची मध्यस्थी मान्य केली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाटाघाटीवेळी अंतर्गत सुरक्षामंत्री निसार अली खान हे उपस्थित होते. दोन्ही पक्षांनी सामंजस्याचे मुद्दे निश्चित केल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी तडजोडीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. राहील शरीफ यांना भेटल्यानंतर इमरान खान यांनी सांगितले, की आता लष्कर या पेचप्रसंगात तटस्थ पंचाची भूमिका पार पाडेल. नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची आमची मागणी कायम आहे, त्यांनी राजीनामा दिल्यास आम्ही आनंदोत्सव साजरा करू.