आक्रमण केल्यास भारताला अद्दल घडवू,  पाकिस्तानी हवाई दलप्रमुखांचा दर्पोक्ती; भारतीय चौक्यांवरील तोफमारीचा पाकिस्तानी चित्रफित प्रसारीत

भारताने दहशतवादास मदत करणाऱ्या पाकिस्तानी हद्दीतील चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाककडून दर्पोक्ती सुरातील धमक्या सुरू झाल्या आहेत. भारताने आक्रमण केल्यास पुढील अनेक पिढय़ा लक्षात ठेवतील अशी अद्दल त्यांना घडवू, असा इशारा पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल सोहेल अमान यांनी रेडिओ पाकिस्तानशी बोलताना दिला. पाकिस्तान शत्रूच्या कुठल्याही दु:साहसाला सडेतोड उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले. एकीकडे या बेटकुळ्या फुगविणे सुरू असतानाच आपणही नियंत्रण रेषेजवळच्या भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांचे जबर नुकसान केल्याचे सांगणारा व्हिडीओ बुधवारी जारी करून पाक लष्कराने आपण भारताला ‘जशास तसे’ उत्तर दिल्याचा दावा केला.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी लढाऊ विमानाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा इन्कार केला आहे. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानचे संबंध सप्टेंबरमध्ये उरी येथे भारतीय लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर बिघडले होते. त्या हल्ल्यात १८ भारतीय जवान ठार झाले होते. त्यानंतर दहा दिवसांनी भारताने लक्ष्यभेद करून दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. अलीकडे भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता पाकिस्तानी छावण्यांवर ९ मे रोजी जोरदार गोळीबार केला होता. त्याच्या ध्वनिचित्रफिती मंगळवारी दाखवण्यात आल्या. बुधवारी एक ध्वनिचित्रफीत जारी करण्यात आली आहे. पाकिस्तानी विशेष दलांनी दोन भारतीय जवानांचा कृष्णाघाटी येथे शिरच्छेद केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानी छावण्यांवर हल्ला केला.

पाक म्हणते.

  • भारताने १३ मे रोजी निर्दोष नागरिकांना लक्ष्य केले. पाकिस्तानी लष्कराने याचे चोख प्रत्युत्तर देऊन नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्या नष्ट केल्या.
  • जंगल क्षेत्रातील काही बांधकामे नष्ट करण्यात येत असल्याच्या लष्करी कारवाईचा जो व्हिडीओ भारतीय लष्कराने जारी केला होता, त्याला पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तर दिले.
  • नौशेरा सेक्टरमधील या चौक्या नष्ट करण्यात आल्याचा भारतीय लष्कराचा दावा चुकीचा आहे.
  • भारतीय सीमेपलीकडून घुसखोरीचे कुठलेही प्रयत्न झाल्यास त्यावर अधिक तीव्रतेने कारवाई करण्यात येईल.

शक्तिप्रदर्शन

काद्री हवाईतळावर एअर चीफ मार्शल सोहेल अमान यांनी वार्ताहरांना सांगितले,की आम्हाला शत्रूच्या कुठल्याही धमक्यांची मुळीच भीती वाटत नाही. जर त्यांनी आक्रमण केले तर त्यांना अद्दल घडवू. स्कार्डू येथे भेट देऊन त्यांनी मिराज लढाऊ विमान उडवून भारताने ९ मे रोजी केलेल्या कारवाईला प्रतिसाद म्हणून शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी सियाचेन या जगातील सर्वात उंचीवर असलेल्या युद्धभूमीत मिराज विमान उडवून एक प्रकारे भारताला इशारा दिल्याचे मानले जात आहे.

पाकचे व्हिडीओ‘अस्त्र’

इस्लामाबाद : पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या चौक्यांवर केलेल्या हल्ल्याची व्हिडीओ क्लिप भारतीय लष्कराने जारी केल्यानंतर, आपणही नियंत्रण रेषेजवळच्या भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला करून त्यांचे जबर नुकसान केल्याचे सांगणारा व्हिडीओ बुधवारी जारी करून पाकी लष्कराने आपण ‘जशास तसे’ उत्तर दिल्याचा दावा केला. पाकिस्तानी लष्कराच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या या व्हिडीओतील संक्षिप्त निवेदनात पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर नजरल आसिफ गफूर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तोफांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या जोरदार माऱ्यात अनेक भारतीय चौक्या पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे ८७ सेकंदांच्या या व्हिडीओत दाखवले आहे.