पाकिस्तानी तटरक्षक दलाने गुजरातच्या सागरी प्रदेशात १२ बोटी व ६५ मच्छीमारांना पकडले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मच्छीमार संघटनेने दिली. या वर्षी जानेवारी महिन्यापासून पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने भारतीय मच्छीमारांना मोठय़ा प्रमाणावर पकडण्याची ही चौथी वेळ आहे.

पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या जवानांनी ६५ मच्छीमारांना पक डले असून, १२ बोटी ताब्यात घेतल्या आहेत असे संघटनेचे सचिव मनीष लोढारी यांनी सांगितले.

ओखा व पोरबंदरचे हे मच्छीमार चार ते पाच दिवसांपूर्वी निघाले होते व त्यांना पाकिस्तानने पकडले आहे व एकूण ११ बोटी पोरबंदर येथून तर एक बोट ओखा येथून निघाली होती. संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की बिनतारी फोनच्या मदतीने या मच्छीमारांनी आमच्याशी संपर्क साधला, त्यामुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजले आहे. अजूनही ते अरबी समुद्राच्या मध्यभागी असून, त्यांना पाकिस्तानी तटरक्षक दलाने त्यांना घेरले आहे.

या वर्षी एप्रिलमध्ये गुजरातच्या आठ बोटींतील ४७ मच्छीमार तर मार्चमध्ये आठ बोटींतील ४८ मच्छीमार पाकिस्तानने जाखाऊ येथे पकडले होते. जानेवारीत सात बोटींतील ३८ भारतीय मच्छीमारांना पकडण्यात आले होते.  अलीकडेच पाकिस्तानच्या सागरी सीमारेषेजवळ गोळीबारात इक्बाल भट्टी हा गुजराती मच्छीमार मारला गेला होता.