मुंबईवर झालेल्या २६\११ हल्ल्यासंदर्भात आणखी पुरावे सादर करा, अशी मागणी  पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. या हल्ल्याचा सूत्रधार असणारा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर आणि अन्य सहाजणांविरोधात पाकिस्तानी न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी भारताने आणखी पुरावे द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.
आमच्या परराष्ट्र सचिवांकडून यासंदर्भात भारताच्या सचिवांना कळवले आहे. मात्र, अजूनही भारताकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफिस झकारिया यांनी दिली. २००८ साली मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने लख्वीसह सातजणांना अटक केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी लख्वीची जामीनावर सुटका करण्यात आली होती. यानंतर लख्वीचा ठावठिकाणा कुणालाही ठाऊक नाही. गेल्या सहा वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. त्यामुळे भारताकडून हा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी करण्यात येत होती. भारताच्या दाव्यानुसार पाकिस्तानला सर्व पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, आणखी पुराव्यांची गरज असल्याचे पाकिस्तानने खटला निकाली काढण्यात असमर्थता दर्शविली आहे.