पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील सुफी दर्गावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रे अफगाणिस्तानमधून हलवण्यात आल्याचे निवेदन पाक लष्कराने दिल्यानंतर काही वेळातच हा हल्ला केल्याचे समजते. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या दुतावासास बोलावणे धाडले होते. दुतावासातील अधिकाऱ्याला पाकिस्तानने ७६ दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. या अतिरेक्यांचा पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानमधील लाल शहबाज कलंदर दर्ग्यावर शुक्रवारी रात्री आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये ८८ जणांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते.

आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानने लगेच हा हल्ला अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांनी केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जिओ टीव्हीने सैन्य दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांवर काल रात्री हल्ले करण्यात आले. परंतु या बाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. जर या हल्ल्याला दुजोरा मिळाला तर अफगाणिस्तानच्या जमिनीवर पाकिस्तानी सैन्याने केलेली अशाप्रकारची ही पहिलीच मोहिम असेल.
जिओच्या वृत्तात म्हटले आहे, जमात उल अहरारच्या चार तळांवर पाक सैन्यांनी हे हल्ले केले आहेत. काही वृत्तांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात अहरारचा उपकमांडरसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येते. अफगाणिस्तानने देशाच्या पूर्व भागात झालेल्या गोळीबारप्रकरणी पाकिस्तानच्या राजदूताला समन्स बजावल्याचे अफगाणिस्तानमधील काही माध्यमांनी आपल्या वृत्तांत म्हटले आहे.