मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दाव संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचे लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अखेर पाकिस्तानने सरकारने मान्य केले आहे. तसेच त्याच्या वृत्तांकनावर देखील पाकिस्तानात बंदी आणण्यात आली आहे. लष्करे तोयबा, जमात-उद-दवा आणि फला-ए-इंसानियत या संघटनांच्या रेडिओ आणि टेलिव्हिजनवरील पाकिस्तानातील वृत्तांकनावर बंदी घालण्याची अधिसूचना पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाकडून(पीईएमआरए) जारी करण्यात आली आहे.

जमात-उद-दवा आणि फला-ए-इंसानियत या दोन्ही संघटना लष्करे तोयबाशी निगडीत शाखा असल्याचे पाकिस्तानने पहिल्यांदाच मान्य केले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या दहशतवादी संघटना तसेच लष्करे तोयबा आणि अन्य दहशतवादी संघटना यांच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाअंतर्गत कडक कारवाईचे वचन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना दिले होते. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.  मात्र, ओबामा यांना दिलेल्या वचानानुसार शरीफ यांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.