बलुचिस्तानात अलीकडेच जे दोन हल्ले झाले त्यात भारताच्या ‘रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग’ म्हणजे ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा आरोप पाकिस्तानने यापूर्वीच केला असून आता पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवण्यास भारतच जबाबदार आहे, अशी तक्रार अमेरिकेकडे करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एझाझ चौधरी हे ओबामा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असून ते भारताविरोधात तक्रार करतील.
भारत पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवित असल्याचा मुद्दा अमेरिकेकडे उपस्थित करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ ने दिले आहे. चौधरी हे अमेरिकेला रवाना झाले असून ते पाकिस्तानातील हल्ल्यात रॉचा हात असल्याचे पुरावे देणार आहे. भारत पाकिस्तानात अतिरेकी कारवाया करीत असल्याचे उलटे आरोप पाकिस्तानने बलुचिस्तानमधील दोन हल्ल्यांनंतर केले आहेत. भारताने हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. पाकिस्तान-अमेरिका कार्यकारी गटाच्या बैठकीत चौधरी हे नेतृत्व करणार आहेत, ती बैठक उद्या होत आहे. द्विपक्षीय संबंध, शस्त्रास्त्र नियंत्रण, अण्वस्त्र प्रसारबंदी व आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्दय़ांवर या वेळी चर्चा होणार आहे.
पाकिस्तानचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. पाकिस्तानातील हल्ल्यात भारताचा हात कसा आहे याबाबतची माहिती सरकारने चौधरी यांना दिली असून ते ही माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांना देतील. अतिरेक्यांना मारण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर करू, हे भारतीय संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांचे विधान अमेरिकेच्या कानावर घालण्यात येणार आहे. भारताच्या या वादग्रस्त विधानामुळे पाकिस्तानात भारतच अतिरेकी कारवाया करीत असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझीझ यांनी सांगितले होते की, पाकिस्तानमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न भारत करीत आहे, पण भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडू असे त्यांनी नाझरिया पाकिस्तान कौन्सिलच्या कार्यक्रमात सांगितले होते. पाकिस्तान व चीन यांच्यातील आर्थिक मार्गिका प्रकल्प मनाविरूद्ध असल्याने भारत अतिरेकी कारवाया करीत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. पाकिस्तानने १९९८ मध्ये केलेल्या अणुस्फोटांमुळे दक्षिण आशियात धाक दाखवण्याचा भारताचा प्रयत्न फसला आहे, असेही ते म्हणाले होते.