पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून सुमारे ४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतरही पाकिस्तान वठणीवर येत नसल्याचे दिसत आहे. शनिवारी पहाटेपासून अखूनर प्रांतात पाक सैन्य दलाने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सकाळी उशिरापर्यंत गोळीबार सुरू ठेवला होता. दरम्यान पाकिस्तानने भारताविरोधात षडयंत्रे रचल्यास भारत पुन्हा एकदा सडेतोड प्रत्युत्तर देईल अशा शब्दात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
संयमीपणा भारताचा दुबळेपणा समजू नका. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने अजूनही तपासाला सुरूवात केलेली नाही हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया मनोहर पर्रिकर यांनी दिली. पाकिस्तानने भारताविरोधात षडयंत्रे रचू नयेत. नाही तर पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील. भारत पुन्हा एकदा सडेतोड उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिली.
दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पच्या ब्रिगेड कमांडरची बदली करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत उरी कॅम्पचे ब्रिगेड कमांडर के. सोमाशंकर यांची बदली करण्यात आली आहे. उरी कॅम्पच्या नव्या ब्रिगेड कमांडरपदी एस. पी. अहलावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.