बालकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मलाला युसुफझई हिच्यावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानातील दहा तालिबानी दहशतवाद्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
खैबर पख्तुन्वा प्रांताच्या स्वात जिल्ह्य़ातील विशेष न्यायालयाने या गुन्ह्य़ातील आरोपींवर खटला चालवल्यानंतर त्यातील दहा जणांना दोषी ठरवून प्रत्येकी २५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने ऑक्टोबर २०१२ मध्ये मलालावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्या वेळेस १५ वर्षांची असलेली मलाला बसमधून स्वात खोऱ्यातील तिच्या शाळेत जात असताना दहशतवाद्यांनी तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या, परंतु त्यातून ती बचावली. या हल्ल्यात सहभागी असलेल्या १० जणांना आपण अटक केल्याचे पाकिस्तानी लष्कराने सप्टेंबर २०१४ मध्ये म्हटले होते.
या हल्ल्यातून बचावलेल्या मलालावर आधी पाकिस्तानात व नंतर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आल्यानंतर ती बचावली. स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी उभी ठाकल्याबद्दल मलालाची कीर्ती जगात पसरली होती. तिला गेल्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.