पाकिस्तानचा भारताला इशारा

बलुच नेते ब्रहमदाग बुगती यांना आश्रय दिल्यास तुम्ही ‘दहशतवादाचे अधिकृत पुरस्कर्ते’ व्हाल, असा इशारा पाकिस्तानने शुक्रवारी भारताला दिला.

भारताने बुगती यांना आश्रय दिल्यास एका देशाने दहशतवाद्याला आसरा दिल्यासारखे होईल आणि त्यामुळे भारत हा दहशतवादाचा अधिकृत पुरस्कर्ता बनेल, असे ट्वीट पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले.

बुगती यांनी राजकीय आश्रयासाठी केलेला अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाला मिळाला असून ते त्याची तपासणी करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आसिफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.सध्या स्वित्र्झलडमध्ये राहणारे बुगती यांनी भारतात आश्रय मागण्यासाठी जीनिव्हा येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. भारताकडून आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.बुगती हे बलुच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.