पाकिस्तानातील एधी फाऊंडेशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देऊ केलेली एक कोटी रूपयांची देणगी नाकारली. याच एधी फाऊंडेशनने फाऊंडेशनने भारतात नुकत्याच परतलेल्या गीताचा पाकिस्तानमध्ये असताना सांभाळ केला होता. मूकी व बहिरी असलेली भारतीय मुलगी गीता पंधरा वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेली होती, अखेर काल ती भारतात परतली. तब्बल दहा वर्षे गीताचा सांभाळ केल्याबद्दल  नरेंद्र मोदींनी एधी फाऊंडेशनला एक कोटी रूपयांची आर्थिक देणगी देण्याची घोषणा केली होती. मात्र, एधी फाऊंडेशनकडून ती नाकारण्यात आली. प्रसिद्ध समाजसेवक अब्दुल सत्तार एधीचे संस्थापक असून त्यांनी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची घोषणा केल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले. मात्र ही देणगी स्विकारण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला आहे, अशी माहिती ‘एधी’चे प्रवक्ते अन्वर काझ्मी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गीताची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला १ कोटी रूपयांची मदत जाहीर केली. एधी फाऊंडेशनने गीतासाठी जे काही केले ते अमूल्य असल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले होते.
गीता भारतातून पाकिस्तानात गेली तेव्हा ७-८ वर्षांची होती व पंधरा वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी रेंजर्सला सापडली होती. नंतर तिला एधी फाउंडेशनने दत्तक घेतले व नंतर ती कराचीत रहात होती.  सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे गीताची ही कहाणी पुढे आली होती.