भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांनी परराष्र्ट् धोरणाबद्दल केलेले मतप्रदर्शन पाकिस्तानच्या दृष्टीने उत्साहवर्धक असून, लवकरच पाकिस्तानशी सौहार्दतेचे संबंध प्रस्थापित करणारे आणि शांततामय सहजीवनास चालना देणारे स्थिर सरकार भारतात येईल, असे कौतुकोद्गार पाकिस्तानच्या उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी काढले. मोदींच्या या धोरणांमुळे पाकिस्तान भारताशी व्यापक आणि दृढ संबंध प्रस्थापित करू शकेल, अशी आशाही पाकिस्तानी उच्चायुक्तांनी व्यक्त केली.
भारताशी पुन्हा संवाद प्रक्रिया सुरू व्हावी अशीच आमचीही इच्छा आहे. उभय देशांमधील मतभेदाच्या मुद्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे, मात्र सध्या कोणतेही राष्ट्र संवाद प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे संवाद खोळंबला आहे. मात्र, भारताने संवाद प्रक्रिया सुरू केली तर उभय देशांमध्ये सहसंबंध निर्माण करणे सुलभ होईल, असेही बसित यांनी सांगितले.
मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य एका भाजप नेत्याने केले आहे, याबाबत बसित यांना विचारले असता, या विधानाबाबत काहीही माहीत नसल्याचे ते म्हणाले. विधान नेमके काय आहे, हे जाणून घेईन आणि त्यानंतर प्रतिक्रिया देईन, असे बसित म्हणाले.