संयुक्त राष्ट्रांच्या सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भाषणादरम्यान पाकिस्तानवर केलेल्या आरोपांना पाकिस्तानचे राजदूत मलीहा लोधी यांनी उत्तर देत भारताविरोधातच उलट्या बोंबा मारल्या. यावेळी त्यांनी चक्क पॅलेस्टिनींच्या हल्ल्यात बळी गेलेल्या एका महिलेचे छायाचित्र काश्मीरची महिला म्हणून दाखवत काश्मिरी जनतेवर भारत कशा प्रकारे अत्याचार करीत आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

लोधी यांनी सभेमध्ये खोटी गोष्ट रचत पॅलेट गनच्या माऱ्यामुळे चेहऱ्यावर जखमा झालेल्या महिलेचे छायाचित्र दाखवले आणि म्हटले की, हा भारतीय लोकशाहीचा चेहरा आहे. अशा प्रकारे काश्मिरींवर अत्याचार केले जात आहेत. मात्र, लोधी यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. कारण, १७ वर्षीय राविया अबू जोमा या मुलीचे हे छायाचित्र असून माध्यमांनी हे छायाचित्र अनेकवेळा दाखवले आहे. गाझा पट्ट्यात २०१४ मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान या मुलीच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. पुरस्कार विजेते छायाचित्रकार हैदी लेविन यांनी रावियाचे हे छायाचित्र काढले होते.

भारताकडून संयुक्त राष्ट्र संघात टेररिस्तान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने ‘भारतच दहशतवादाची जननी’ असल्याचा कांगावा केला आहे. ‘भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे,’ असे राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले होते. भारताकडून पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पाकिस्तानचा बुरखा फाडला. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यापासून भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. मात्र पाकिस्तानने केवळ दहशतवादी संघटना उभारण्यातच धन्यता मानली,’ अशा कठोर शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. स्वराज यांच्या या टीकेमुळे पाकिस्तानचा संताप झाला आहे. भारताला रोखण्याचे आवाहन पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आले आहे. ‘दोन शेजारी देशांमधील संघर्ष टळवा, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असल्यास त्यांनी भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याच्या सूचना कराव्यात,’ असा कांगावा पाकिस्तानने केला.