हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव शोएब असल्याची माहिती पुढे येत आहे. राजस्थानातील जोधपूरमधून शोएबला अटक करण्यात आली आहे. जोधपूर पोलीस शोएबला दिल्लीत आणणार आहेत. या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे.

याआधी हेरगिरीप्रकरणी मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांना दिल्लीतील एका न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर संवेदनशील माहिती शोएबपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी महमूद अख्तरला या दोन आरोपींकडून गोपनीय माहिती पुरवली जात होती, असा दावा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील महमूद अख्तरला हेरगिरीच्या आरोपावरुन ताब्यात घेतले. महमूद उच्चायुक्तालयातील विसा विभागात काम करतो. अख्तरकडून भारतीय सैन्य आणि संरक्षण विभागाची गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तहर यंत्रणा असलेल्या आयएसआयला दिली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अख्तरसोबतच त्याच्या दोन भारतीय साथीदारांना अटक केली आहे. या दोघांवर अख्तरला सहाय्य करण्याचा आरोप आहे. राजदूतांना मिळणारे संरक्षण असल्याने अख्तरला सोडून देण्यात आले आहे. मात्र त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुन्हे शाखेचे सहआयुक्त रविंद्र यादव यांनी अख्तरची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ‘अख्तरने तो चांदनी चौकचा रहिवासी असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर कठोरपणे चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने त्याचे नाव महमूद अख्तर असल्याची माहिती दिली. अख्तरने स्वत:ची ओळख भारतीय म्हणून करण्यासाठी आधार कार्डदेखील बनवले होते,’ अशी माहिती यादव यांनी दिली आहे. ‘अख्तर पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआयसाठी काम करतो. दिल्लीमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील नेमणुकीपासूनच त्याला राजदूतांना मिळणारे संरक्षण प्राप्त झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच त्याला पाकिस्तानच्या राजदूतांकडे सोपवण्यात आले आहे,’ अशी माहिती सहआयुक्त रविंद्र यादव यांनी दिली आहे.