पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणावर सहा आठवड्यांमध्ये पुन्हा सुनावणी घेतली जावी, असे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काल (गुरुवारी) कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले. मात्र आता या प्रकरणी पाकिस्तानने याचिका दाखल केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील एका संकेतस्थळाने दिले आहे.

‘आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला पाकिस्तान पुन्हा आव्हान देणार आहे. यासाठी पाकिस्तानकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे,’ असे वृत्त दुनिया न्यूजने दिले आहे. ‘कुलभूषण जाधव प्रकरणात खवार कुरेशीचे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत,’ अशी माहितीदेखील दुनिया न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात शनिवारपर्यंत अपील करु शकतात. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने १० एप्रिल रोजी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारतीय गुप्तहेर यंत्रणा ‘रॉ’साठी हेरगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवला आहे.

हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा पाकिस्तानचा दावा धुडकावून लावत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला गुरुवारी स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन योग्यरित्या न केल्याबद्दलही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला फटाकरले.