भारत आणि पाकिस्तानातील संबंध विकोपाला गेले आणि बॉलीवूडच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली तर पाकिस्तानच्या चित्रपट उद्योगाचे ७० टक्के नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारले नाहीत तर भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी होईल आणि त्यामुळे चित्रपट व्यवसायाचे नुकसान होईल, अशी भीती वाढत चालली आहे.

बॉलीवूड आणि हॉलीवूडचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होत असल्याने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाला भरभराटीचे दिवस आले होते ही बाब सत्य असल्याचे प्रसिद्ध वितरक नदीम मांडवीवाला यांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशांमधील संबंध दीर्घकाळ ताणलेले नसतील अशी आपली अपेक्षा आहे, ही बंदी तात्पुरती असल्यास काळजीचे कारण नाही, मात्र कायमस्वरूपी बंदी घातल्यास अनेक चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्स यांना टाळे ठोकण्याची स्थिती निर्माण होईल, असे मांडवीवाला म्हणाले.

पाकिस्तानात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांनी चांगला व्यवसाय केला आहे, मात्र चित्रपट उद्योग टिकविण्यासाठी दरवर्षी किमान ५० ते ६० चित्रपटांची निर्मिती गरजेची असते आणि सध्या त्या प्रमाणात ती होत नाही, असे चित्रपट समीक्षक ओमर अलवी यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानातील ७० टक्के व्यवसाय बॉलीवूड आणि हॉलीवूडमधून होतो, आता दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेल्यास अन्य कोणताही पर्याय नाही, त्याचा विपरीत परिणाम प्रत्येकाला भोगावा लागणार आहे, असे मांडवीवाला म्हणाले.